शिरूर शहरातील मनमानी भारनियमना बाबत भूमिपुत्र प्रतिष्ठानचा आंदोलनाचा इशारा; महिनाभर वीजपुरवठ्याचा आढावा घेणार
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहर व ग्रामीण परिसरात दरवर्षी मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत यावर वेळीच उपाययोजना नकेल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा
भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी महावितरणला दिला आहे.
याबाबत शिरूर महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शरद माने यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत महावितरणला निवेदनात म्हटले आहे की, मार्चपासून पुढील काही महिन्यांत शहर व परिसरात वारंवार व दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित केला जातो. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात असून,स्पष्ट माहिती दिली जात नाही. दुरुस्ती व देखभालीच्या कारणावरून अनेक वेळा ८–८ तास वीज बंद ठेवली जाते, त्यामुळे नागरिक, व्यापारी व उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे पुढील एक महिनाभर शहर व परिसरातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. शहरातील विविध भागात वीज खंडित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे स्पष्टीकरण नोंदवले जाईल. तसेच दिवसभरातील वीज खंडित होण्याच्या वेळा व त्यामागील कारणांचीही नोंद ठेवण्यात येणार आहे.
एक महिन्यानंतर वीजपुरवठा खंडित झालेल्या घटनांची संख्या व कारणांचा सविस्तर अहवाल महावितरणला पाठवण्यात येणार असून त्यावर समाधानकारक कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती नसताना भारनियमन कोणाच्या परवानगीने केले जाते, याची लेखी माहितीही मागवण्यात येणार असल्याचे सुशांत कुटे यांनी सांगितले

