करडे येथे तलाठ्याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ
शिरूर (प्रतिनिधी):
करडे (ता. शिरूर) येथील पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पवन अशोक बांदल (वय ३२) यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन बांदल हे मंगळवारी सकाळी घरून नेहमीप्रमाणे पाबळ येथे कामावर जात असल्याचे सांगून निघाले होते. त्यावेळी त्यांनी सोबत दप्तर आणि जेवणाचा डबा घेतला होता. निघताना त्यांच्या भावाने, श्रीनिवास बांदल यांनी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यास सांगितले होते.
सुमारे १२.४५ च्या सुमारास श्रीनिवास बांदल विहिरीकडे गेले असता, त्यांना तिथे पवन यांची गाडी आणि बॅग दिसली. त्यांनी विहिरीत पाहिल्यावर पाण्यात पवन यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ गावातील नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील रुग्णालयात पाठवला.पवन बांदल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोथे करीत आहेत.