शिरूर जवळ एकाला जबर मारहाण महामार्गावर तलवारी चाकू घेऊन टोळक्यांचा हैदोस
शिरूर, प्रतिनिधी
पुणे अहिल्यानगर महामार्गावरील बोऱ्हाडे मळ्याजवळ (ता. शिरूर) सात आठ जणांच्या टोळक्याने महामार्ग थांबवून पाठलाग करीत एका तरुणाला बेदम मारहाण करीत कोयता, तलवार आणि बंदूक नाचवीत या टोळक्याने महामार्गावर हैदोस घातला व या तरुणांनी आता पोलिसांनाच आव्हान दिले आहे असे म्हणावे लागेल.
यामुळे शिरूर शहर व परिसरात घबराट पसरली. मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात अजय माणिक घेगडे (वय २०, रा. राजापूर माठ, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शिरूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केले असून, पुढील उपचारासाठी त्याला ससून रूग्णालयात दाखल केले. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
जखमी अवस्थेतील घेगडे याने दिलेल्या माहितीनुसार, तो बोऱ्हाडे मळा परिसरातील आर. के. हॉटेलजवळ कामानिमित्त आला असताना अतिश गव्हाणे, ओंकार शेंडगे, किरण चोरे, देवा धोसे, जितेंद्र शेंडगे, नरेंद्र शेंडगे (सर्व रा. डोंगरगण, ता. शिरूर) यांच्यासह दहा बारा जणांनी त्याला घेरले. त्यांच्या तावडीतून सुटून तो न्हावरे फाट्याच्या दिशेने पळत सुटला असता हल्लेखोरांनी दुचाकीवरून पाठलाग करीत त्याला अडविले व लाकडी दांडके, कोयता आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांकडे कोयता, लांबडी, चॉपर व बंदूक होती.
दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून, जखमींवरील उपचारानंतर त्याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला जाईल, असे शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले
.

