शिरूरच्या बेट भागात वनविभागाला २६ बिबटे पकडण्यात यश
शिरूर प्रतिनिधी
पिंपरखेड व चांडोह परिसरात (ता. शिरूर) पुन्हा दोन बिबटे जेरबंद केले असून, आतापर्यंत बेट भागातून एकूण २६ बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
शिरूर तालुक्यात १२ ऑक्टोबरपासून पिंपरखेड येथे १३, जांबूत ४, फाकटे ३, टाकळी हाजी २, निमगाव दुडे १, रावडेवाडी १ आणि चांडोह येथे १ बिबट्या जेरबंद झाला आहे. तर एका बिबट्याला ठार मारण्यात आले आहे.
पिंपरखेड व जांबूत येथे एका महिन्यात तीन नागरिकांचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर प्रशासन तत्पर झाले. वनमंत्री गणेश नाईक यांनी या भागाला भेट देऊन बिबटे पकडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन निधीतून पालकमंत्री अजित पवार यांनी नवीन पिंजरे खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला. हे पिंजरे आंता वन विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे विविध ठिकाणी लावले जात असल्याने बिबटे जेरबंद होण्याचे
प्रमाण वाढले आहे.गेल्या दोन दिवसांत पिंपरखेड येथे दोन आणि चांडोह येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. सध्या या
भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोडीचे काम सुरू असून उसातून बिबटे बाहेर पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणेआहे. अजूनही अनेक ठिकाणी वस्तीवर
बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सध्या कांदा लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून पुढील महिन्यात कांदा खुरपणीला सुरुवात होणार आहे. या कामांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण आहे.
वनविभाग प्रत्येक गावात बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांकडून मागणी येताच पिंजरे लावले जात आहेत. या भागातील बिबटे जेरबंद करून परिसराला सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. - निळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

