शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड दत्तवाडी येथे आज सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने तेरा वर्षे मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढत नेले या हल्ल्यात या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे पिंपरखेड जांबुत येथील वृद्ध व लहानगे चिमुकले बिबट्याच्या हल्ल्यामुळे असुरक्षित झाले आहे.
या घटनेनंतर या ठिकाणी पाहणीसाठी आलेल्या वन विभागाची गाडी येथील संतप्त नागरिकांनी पेटून दिली आहे
रोहन विलास उर्फ बाळू बोंबे (वय १३, रा. दत्तवाडी, पिंपरखेड ता. शिरूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
शिरूर तालुक्यात आमदार खासदार बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपायोजना करण्याकरिता अपयशी ठरले आहे. राज्य आणि केंद्रात यांचे कोणी ऐकते का नाही अशी परिस्थिती दिसून येत असून, केवळ हल्ला झाल्यावर सांत्वन करण्यासाठी येऊन फायदा नाही. या भागातील शाळकरी मुलांची चिमुकल्यांची शेत कामगारांची शेतकऱ्यांची वृद्ध महिला पुरुषांचीसुरक्षितता आता कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न पडला असून राज्य शासन व केंद्र शासन आणखी किती निष्पाप लहान मुले वृद्ध महिला पुरुष यांचे बळी घेणार आहेत असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहे.
या सर्वांना घराच्या बाहेर किंवा शेतात काम करण्यासाठी जाण्यास किंवा शाळेमध्ये जाण्यास बिबट्याचा प्रतिबंध झाला आहे. जीव धोक्यात घालून आता काम करणे शक्य नसल्याने आता बिबट्याला मारण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी शेतकरी व सर्व सामान्य नागरिक करीत आहे. अन्यथा पुढील काळामध्ये नागरिक कायदा हातात घेतील कारण याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही हे सांगायला नको.
गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे शेतात कामे करायची का नाही ..मुले अंगणात खेळवायची का नाही .... शेतात कामाला जायची का नाही...आता यांची सुरक्षा रामभरोसे झाली असून या बिबट्यांचा बंदोबस्त करणार कोण? हा मोठा प्रश्न पिंपरखेड जांबुत या भागातील सर्व सामान्य शेतकरी नागरिकांना पडला आहे.
पिंपरखेड दत्तवाडी येथे आज दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास विलास बोंबे यांचा तेरा वर्षीय मुलगा रोहन घराच्या अंगणात असताना जवळच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला जवळच्या शेतात ओढत नेले याच वेळी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने व मुलाचा जवळच्या उसाच्या शेतात शोध घेतल्याने तो सापडला परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
तेरा वर्षीय रोहनच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी 12 ऑक्टोबर रोजी पिंपरखेड येथे शिवन्या बॉम्बे या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर त्यानंतर दहा दिवसात जांबु तेथील भागुबाई रंगनाथ जाधव या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर येथील नागरिक संतप्त झाले होते या संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून वन विभागाचा निषेधही केला होता. आम्ही जगायचं कसं... लहान मुले वृद्ध सर्वात जण आता असुरक्षित झाले आहेत. अशी शांतता भावना नागरिकांनी शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर या परिसरात काही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले होते परंतु आज पुन्हा एका चिमुकल्याला या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी झाला त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे.
२०१९- २०२५: शिरूर वनपरिक्षेत्रातील बिबट्या हल्ल्यांतील गावे, मृत्युमुखी पडलेल्यांची नावे
बारा जणांचा मृत्यू झाला आहे.
क्रमांक गाव. घटनेची तारीख. मृताचे नाव
जांबूत ६ ऑक्टोबर २०१९ समृद्धी योगेश जोरी
जांबूत १ सप्टेंबर २०२२ सचिन बाळु जोरी
जांबूत १२ ऑक्टोबर २०२२ पूजा भगवान नरवडे
पिंपरखेड १ फेब्रुवारी २०२३ पूजा जालिंदर जाधव
मांडवगण फराटा १८ ऑक्टोबर २०२४ वंश राजकुमार सिंग
मांडवगण फराटा १५ नोव्हेंबर २०२४ शिवतेज समाधान टेंभेकर
पिंपळसुटी २४ डिसेंबर २०२४ रक्षा आदिनाथ निकम
जांबूत २५ ऑगस्ट २०२४ मुक्ताबाई भाऊ खाडे
इनामगाव २५ एप्रिल २०२५ लक्ष्मीबाई बबन भोईटे
पिंपरखेड १२ ऑक्टोबर २०२५ शिवन्या शैलेश बोंबे
जांबूत २२ ऑक्टोबर २०२५ भागुबाई रंगनाथ जाधव
पिंपरखेड २ नोव्हेंबर २०२५ रोहन विलास उर्फ बाळू बोंबे

