पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कर्नाटकातील बड्या सराफ व्यावसायिकाच्या अपहरण-खून करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शिरूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील बड्या सराफाचे पाच कोटी रुपयांची खंडणी न दिल्याने अपहरण करून त्याचा खून केलेल्या आरोपींना शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकांनी मलठण ता. शिरूर येथे सापळा रचून पकडले असून आरोपींनी कर्नाटक येथील अपहरण व खुनाची कबुली दिली असून याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींना कर्नाटक येथील हिरेहाडागळी पोलीस स्टेशन पोलिसांचे ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
मंजुनाथा एन. शेजामडकर (वय ५८ वर्षे, रा. होलालु गाव, ता.हाडागळी, जि. विजयनगर, कर्नाटक) या बड्या सराफाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना कर्नाटक राज्य, ता. हाडागळी, जि. विजयनगर येथील हिरेहाडागळी पोलीस स्टेशन कर्डील पोलीसांकडुन बातमी मिळाली होती की त्यांच्या पोलिस स्टेशन हद्दीतील मंजुनाथा एन. शेजामडकर (वय ५८ वर्षे, रा. होलालु गाव, ता.हाडागळी, जि. विजयनगर, कर्नाटक) याचे अज्ञात आरोपीनी अपहरण करून ते मलठण (ता. शिरूर), येथे लपले असल्याचे सांगितले.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या गंभीर गुन्ह्याची व माहितीची दखल घेऊन शिरूर पोलिस स्टेशन पोलिस हवालदार भवर, पोलीस कॉन्स्टेबल शिरोळे, शिंदे, रावडे यांचे पथक तयार करून पथक आरोपीचा शोध घेणेकामी मलठण येथे रवाना करून या पोलिस पथकाने मलठण येथे गुप्त माहिती आधारे आरोपी लपलेल्या ठिकाणी अचानक छापा टाकुन तेथुन २ आरोपींना ताब्यात घेतले त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नावे योगेश बेरोटेप्या अंगदी (वय २४ वर्षे, रा.कोटे, होलाछु, ता. हाडगळी, जि. विजयनगर कर्नाटक),मल्लिकार्जुना नागप्पा उज्जाम्मानावरा (वय २५ वर्षे, रा.कोटे, होलाछु, ता.हाडगळी, जि. विजयनगर कर्नाटक) असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे केलेल्या चौकशी मध्ये त्यांनी सदर अपहरण केलेला व्यक्ती मंजुनाथा एन. शेजामडकर (वय ५८ वर्षे, रा. होलालु गाव, ता. हाडागळी, जि. विजयनगर, कर्नाटक) हा होलाळु गावचा मोठा सराफ व्यापारी असुन त्याचे दि.१० ऑक्टोबर २५ रोजी होलाळु कर्नाटक येथुन सकाळी मॉर्निंग वॉकचे दरम्यान अपहरण करून त्याला चारचाकी कारचे डिक्कीमध्ये टाकुन त्याचे नातेवाईकांकडुन ५ कोटी रूपयांची खंडणी मागून मागणी केलेली खंडणीची रक्कम न मिळाल्याने त्याचा खुन करून त्याचे प्रेत पुराव नष्ट करण्याचे उद्देशाने तुंगभद्रा नदी, कर्नाटक येथे नदीत टाकुन दिले असल्याचे सांगितले. या आरोपींना पोलिस पथकाने ताब्यात घेवुन खंडणीसाठी अपहरणासह खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करिता हिरेहाडागळी पोलीस स्टेशन कर्नाटक यांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास हिरेहाडागळी पोलीस स्टेशन करित आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राहुल भवर, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिरोळे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, निखिल रावडे यांनी केलेली आहे.

