साबळेवाडी टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे विहीरीत उतरलेल्या विजेच्या करंटमुळे बापलेकांचा मृत्यू
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी विधीची मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या बाप लेकांचा विहीरीत उतरलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे टाकळीहाजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७, रा. साबळेवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) यांचा बाप लेकांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाच सप्टेंबर रोजी सकाळी सुदाम गाढवे हे विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ लोटला तरी ते परत न आल्याने मुलगा भारत त्यांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला. त्याने वडिलांना पाण्यात पडलेले पाहून त्यांना वाचविण्यासाठी मित्राला हाक देत विहिरीत उडी घेतली, मात्र त्यालाही विजेचा जबर धक्का बसला. पाण्यात विजेचा करंट उतरल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला.
भारतच्या मित्राने बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. ग्रामस्थांनी वीजप्रवाह बंद करून बापलेकाला विहिरीतून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायातील भक्तीमय कार्यात अग्रेसर होते. ते टाकळीकर प्रासादिक दिंडीसोबत दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत असत. भजनी मालिकेचे त्यांना विशेष ज्ञान होते. मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी येथे अकरावीचा विद्यार्थी होता.
गाढवे कुटुंब नगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून टाकळी हाजी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांनी दूध व्यवसाय उभारला होता. सध्या त्यांच्या कुटुंबाकडे दहा ते पंधरा जर्सी गाई असून दररोज शंभर लिटर दूध डेअरीला पुरविले जात होते.
बापलेकाच्या अकाली निधनाने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पस
रली आहे.

