कळस येथे मंगळवारी (ता. 2 ) रात्री साडेसात वाजणेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कळस ते सुतार वस्ती रस्त्यावर जवळ ही घटना घडली.
या बाबत माहिती आशी की, गाडगे हे आपल्या कळस गावातून आपल्या घराकडे रानमळ्याच्या रस्त्याने जात असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. गाडगे रात्री आठ वाजेपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शोध सुरु केला त्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. गाडगे यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कळस परिसरात उसाचे प्रमाण अधिक आहे तसेच जवळपास डोंगर भागावर वृक्षांचे प्रमानाही चांगले आहे त्यामुळे या परिसरात बिबट्यांचा नेहमीच वावर असतो.
यापूर्वी या परिसरात शेळ्या मेंढया कुत्रे व इतर जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अद्याप मानवी जीवितहानी झाली नव्हती. या ठिकाणची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. गणेश गाडगेंच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करावा त्या साठी तातडीने पिंजरे लावावेत अशी मागणी केली आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून येथे पिंजरे लावण्याचे नियोजन केले आहे.
बिबट्या चा हल्ला झाला त्या परिसरात दोन पिंजरे लावले आहेत आम्ही परिसराची पहाणी केली आहे.या कुटुंबास शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांना दहा लाख रुपये रोख व 15 लाख रुपयांचे मदत ठेव पावती अशी मदत सरकारच्या वतीने नियमानुसार मिळणार आहे.
कळस गावाच्या तिनही बाजूला डोंगर परिसर आहे तसेच काही भागात उसाची शेती आहे. या परिसरात किमान आठ ते दहा बिबटे आहेत एखादा पकडला तरी इतर बिबटे पुन्हा आल्याशिवाय राहणार नाहीत त्याचा येथे सतत वावर असतो त्यामुळे लोकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
राहुल गाडगे, सरपंच, कळस.