लुधियाना पंजाब येथून अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या बालकाची सुखरूप सुटका
रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर प्रतिनिधी
कारेगाव ता.शिरूर येथे बाहेर जाताना सांभाळण्यासाठी दिलेले तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला घेऊन गेलेल्या दापत्याला
लुधियाना (पंजाब) येथून सुखरूप पकडले असून तीन वर्षाच्या मुलाची सुटका करण्यात यश आले आहे. परप्रांतीय दांपत्याने बालकाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पोलिसांनी आरोपींना पंजाबेत जाऊन जेरबंद केले.
याप्रकरणी पुजादेवी उर्फ वनिता यादव (३७) व अर्जुनकुमार यादव (३६) यांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिस चौकशीत आरोपींनी मुलबाळ नसल्याने व बालकावर आपुलकी जडल्याने त्याचे अपहरण केल्याचे कबूल केले आहे.
कारेगाव ता.शिरूर येथील काजल महेंद्र पडघाण या आपल्या भावासह व ३ वर्षीय मुलगा आयुषसोबत वास्तव्यास आहेत. कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर मुलाला सांभाळण्यासाठी त्यांनी शेजारी राहणाऱ्या पुजादेवी यादव या परप्रांतीय महिलेकडे सोपवले होते. परंतु, दिनांक १२ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे मुलाला दिल्यानंतर संध्याकाळी परत आल्यावर मुलगा व यादव दांपत्य गायब असल्याचे लक्षात आले. दोन दिवस वाट पाहूनही ते परत न आल्याने अखेर दिनांक १५ सप्टेंबर रोजी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविण्यात आली.
गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी वरिष्ठांना कळवून तातडीने तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक पोलिसांच्या मदतीने यादव दांपत्य पंजाब राज्यातील लुधियाना येथे असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ तपास पथक पंजाबेत रवाना झाले व तेथील पोलिसांच्या मदतीने आरोपी पुजादेवी उर्फ वनिता यादव (३७) व अर्जुनकुमार यादव (३६) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीनवर्षीय आयुषची सुखरूप सुटका करण्यात आली असून आयुष आईच्या कुशीत जाताच आईने आनंदात्रूला वाट मोकळी करून दिली तर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे आभारही मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय सरजिने, संकेत जाधव व लुधियाना येथील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल, गुरमित सिंग व त्यांच्या टीमने केली.