शिरूर बोरा महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न
शिरूर प्रतिनिधी
सक्षमता हे स्त्रीला जन्मजात मिळालेले वरदान आहे, पण अनेकदा अज्ञानामुळे त्या स्वतःच्या ताकदीची जाणीव ठेवत नाहीत. ती जाणीव निर्माण होणे म्हणजेच सक्षमीकरण,” असल्याचे प्रतिपादन विधितज्ञ अॅड. सुप्रिया कोठारी यांनी करून.महिलां विषयीचे कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत माहिती व कायद्याचे ज्ञान महिलांसाठी अत्यावश्यक असून, विद्यार्थिनींना अन्यायाविरुद्ध कशी तक्रार करावी कायदेशीर प्रक्रिया कशी पाळावी याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय विद्यार्थिनी मंच, महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गुणवत्ता सुधारयोजनेअंतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले.
यावेळी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव, प्रमुख वक्त्या पुण्यातीलविधिज्ञ अॅड. सुप्रिया कोठारी , स्त्रीरोगतज्ञ डॉ. सोनाली हार्दे , डॉ. अयोध्या क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया कोठारी म्हणाल्या कायद्याचे ज्ञान प्रत्येक महिलेसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थिनींना अन्याय व अत्याचाराविरुद्ध तक्रार कशी नोंदवावी, कायदेशीर पद्धतीने कोणते टप्पे पाळावेत, याची सविस्तर माहिती देऊन महिलांना स्वतःच्या अस्तित्वाची आणि अधिकारांची जाणीव होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आणि “स्वतः सक्षम व्हा, इतरांनाही सक्षम करा” हा संदेश दिला. तसेच त्यांनी पुण्यात सुरू केलेल्या भगिनी हेल्पलाइनच्या स्थापनेमागील प्रेरणा, उद्दिष्टे आणि कार्य याची माहिती देत, ही सेवा महिलांसाठी संकटसमयी कशी हातभार लावते, याचे वास्तव उदाहरणे देऊन सांगितले.
यावेळी शिरूर शिक्षण मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी “सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा पाया म्हणजे शिक्षण” असे ठाम प्रतिपादन केले. शिक्षणामुळे महिलांमध्ये विचारांची जाणीव, अधिकारांची जाण आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी महिलांनी आपल्या सक्षमततेचा सकारात्मक व विचारपूर्वक वापर करावा, तसेच “स्व” ची जाणीव आणि अंतर्गत ताकद ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते म्हणाले अशा कार्यशाळा महिलांची भूमिका समाजात सक्षम, सशक्त आणि सजग करण्यास महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगितले. त्यांनी “आज महिलांना केवळ सक्षमीकरणाची नाही, तर स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची गरज आहे” हे वक्तव्य करत, महिलांच्या सामाजिक स्थानाच्या उन्नतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.
यावेळी शिरूरच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. सोनाली हार्दे यांनी ‘मस्त मन, चुस्त शरीर’ या विषयावर विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी प्रभावी मार्गदर्शन करताना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी यांचे जीवनातील महत्त्व त्यांनी पटवून दिले.
या कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थिनींची BMI तपासणी करण्यात आली, तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून एक पूर्वचाचणीही घेण्यात आली. डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी या सर्वेक्षणाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. पल्लवी ताठे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. रेणुका करपे तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील भोईटे यांनी केले.