शिरूर प्रतिनिधी
ढोल-ताशांचा गजर, सुमधुर ब्रास बँडचे सूर, “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषात आणि वरुणराजाच्या आनंदाच्या सरींमध्ये गणरायाचे स्वागत दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. लहानग्यांनी चिमुकल्या हातांनी, तर घरोघरी दृष्ट काढून गणरायाचे आगमन मंत्रोचार करीत सुखकर्ता दुखहर्ता आरतीने मोठ्या उत्साहात गणेशाची स्वागत करण्यात आले.
आज शिरूर शहरात तसेच परिसरात विधिवत पूजाअर्चेनंतर घरगुती व मंडळांचे गणपती मोठ्या श्रद्धा-भक्तीने विराजमान झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची मूर्ती घरी आणण्यासाठी मुलांचा, चिमुकल्यांचा आणि आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. डोक्यावर गणरायाच्या टोप्या घालून, हसऱ्या चेहऱ्याने गणेश मूर्ती घेऊन जाणारे भक्त सर्वत्र दिसत होते. सायंकाळ नंतर शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशांचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नगरपरिषदेच्या वतीने रयत शाळेच्या मैदानावर गणपती विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. यंदा स्टॉलची संख्या लक्षणीय वाढलेली दिसून आली. मूर्तींसह सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, अगरबत्ती, फुलांचे स्टॉल, दुर्वा, केवड्याची पाने, फळे तसेच मिठाईचे स्टॉल गर्दीने फुलून गेले होते. गणेशोत्सवासाठी लागणारी प्रत्येक वस्तू एका ठिकाणी मिळाल्याने भक्तांनी मोठ्या उत्साहाने खरेदी केली.
शिरूरसह तालुक्यातील तसेच शेजारील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी देखील शिरूरला भेट दिली. दुपारपर्यंत सर्व भागात ब्राह्मण काकांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार करून घरगुती गणेशाची प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांचा आनंद आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण मन मोहून टाकणारे होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशन व नगरपरिषदेच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. शाळा मैदान परिसरात पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. दोन चाकी व चार चाकी वाहनांसाठी वेगवेगळे पार्किंग झोन तयार करण्यात आले होते. पोलीस कर्मचारी, महिला पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने तैनात होते. लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना आवश्यक सूचना देत शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात गणरायाचे आगमन होण्यासाठी पोलीस प्रशासन व नगर परिषदेचे कर्मचारी सतत कार्यरत होते.