शिरूर तालुक्यात ३३१ विद्यार्थिनींना नवीन सायकलींची भेट - महेश डोके गटविकास अधिकारी
शिरूर प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील ३३१ गरजू विद्यार्थिनींना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. “सायकलचा आधार, भविष्याला आकार” या पुणे जिल्हा परिषदेच्या हृदयस्पर्शी सायकल बँक उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके म्हणाले की ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. सार्वजनिक वाहतूक सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थिनींना शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून गावोगावी दानशूर व्यक्तींना सायकल देण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक संघटना, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी व दानशूर नागरिकांच्या सहभागातून तब्बल ३३१ सायकली जमा झाल्या. या सायकलींचे वितरण १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आले.
शिरूर तालुक्यातील विविध गावांमधून मिळालेल्या सायकलींपैकी गोलेगाव-१०, करंजावणे-३, पिंपळे खालसा-१०, सोने सांगवी-२, शिरूर ग्रामीण-२, न्हावरा-१, बाभुळकर बुद्रुक-६, कर्डे-३, वरुडे-१, जातेगाव बुद्रुक-२, आण्णापूर-१८, शिरसगाव काटा-४, निमोणे-२४, काठापूर खुर्द-५, धानोरे-१, रांजणगाव सांडस-७, रांजणगाव गणपती-२, दहिवडी-१, तर्डोबाची वाडी-६, सरदवाडी-२, खैरेवाडी-६, केंदुर-३, पारोडी-१५, संविदणे-४, कोंढापुरी-४, तळेगाव-१८, मलठण-१६, कवठे येमाई-२, पाबळ-१, निमगाव म्हाळुंगी-२ सायकलींचा समावेश आहे.