शिक्रापूरात पोलिसावर गुन्हेगारांचे तीक्ष्ण हत्याराने वार पोलिसांचे प्रतिउत्तर केलेल्या गोळीबारात गुन्हेगार ठार
शिरूर( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस व आरोपींच्या झालेल्या झटापटमध्ये पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये एक आरोपी ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या फायरिंग मध्ये लखन उर्फ महेश पोपट भोसले (रा. वडगाव पुसावले, ता. सातारा जि. सातारा )याचा मृत्यू झाला आहे.
सातारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेला लखन भोसले हा त्याच्या साथीदारासह शिक्रापूर येथे असल्याचे कळल्यानंतर साताराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व पोलीस हवालदार सुजित भोसले हे त्यांच्या पथकासह शिक्रापूर हद्दीतील मलठण फाटा येथे आले असता आज सायंकाळी साडेसात ते पावणे आठ च्या दरम्यान त्यांनी संशयित आरोपी लखन भोसलेला पकडले असता लखन भोसले याने पोलीस हवालदार सुजित भोसले यांच्यावर चाकूने वार केल्याने त्यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीवर फायरिंग केली असता पोलिसांनी केलेल्या फायरिंग मध्ये लखन पोपट भोसले रा. वडगाव पुसावले, ता. सातारा जि. सातारा हा गंभीर जखमी झाला असता पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र आरोपी लखन पोपट भोसले रा. वडगाव पुसावले, ता. सातारा जि. सातारा याचा मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून याबाबत बोलताना रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले
कोण होता लखन भोसले
लखन उर्फ महेश पोपट भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 22 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहीवडी, म्हसवड, वडगाव निंबाळकर, बारामती तालुका, इंदापूर, वडूज पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई देखील केली होती. 2022 मध्ये त्याला पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. सद्या तो जामीनावर बाहेर असल्याची माहिती आहे..