राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा – उत्कृष्ट मंडळांना मिळणार राज्यस्तरीय गौरव
शिरूर,(प्रतिनिधी) :
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्ताने शासनाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवले असून, उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर गौरविण्यात येणार असल्याची माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी शासनाने पाच महत्त्वाचे निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये कलांचे जतन व संवर्धन (20 गुण), संस्कृतीचे जतन व संवर्धन (20 गुण), निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन (20 गुण), सामाजिक कार्य (20 गुण) आणि गणेशोत्सव आयोजनातील विधायकता (20 गुण) या मुद्द्यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत केवळ नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. मंडळांनी आपला अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पोर्टलवर विहित वेळेत सादर करावयाचा आहे. मात्र, मागील दोन वर्षे सलग राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय पारितोषिके मिळालेली मंडळे यंदा पारितोषिकासाठी पात्र राहणार नाहीत.
स्पर्धेतील परिक्षणासाठी तालुका स्तरावरील समित्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देवून उच्च दर्जाचे छायाचित्रण व व्हिडिओ रेकॉर्डिंग करतील, तसेच संबंधित मंडळांची कागदपत्रे तपासतील. समितीने दिलेल्या निकषांनुसार मंडळाचे गुणांकन केले जाईल आणि तालुका स्तरावरील विजेत्या मंडळाची शिफारस जिल्हाधिकारी यांचेकडे केली जाईल.
शिरूर तालुक्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५
आता तालुकास्तरावर देखील पारितोषिक जिंकण्याची संधी
राज्यस्तरीय पारितोषिक
प्रथम पारितोषिक रु. ७.५० लाख
द्वितीय पारितोषिक रु. ५ लाख
तृतीय पारितोषिक रु. २.५ लाख
जिल्हास्तरीय पारितोषिक
प्रथम पारितोषिक रु. ५०,०००/-
द्वितीय पारितोषिक रु. ४०,०००/-
तृतीय पारितोषिक रु. ३०,०००/-
तालुकास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी रु. २५,००० व प्रमाणपत्र
नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेची माहिती आणि अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in/या संकेतस्थळावर उपलब्ध.
अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येतील.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क किंवा तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.