शिरूरच्या बोरा महाविद्यालयात रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५ उत्साहात संपन्न
शिरूर, प्रतिनिधी
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने "रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५" तसेच बीज राखी प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
महोत्सवाचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की आरोग्य संपन्न आयुष्यासाठी रानभाज्या व भरड धान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज असून ,प्रत्येकाने यांचे संवर्धन करून पुढील पिढीकडे हा वारसा जपण्यासाठी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
रानभाज्या व भरड धान्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी ६३ पेक्षा अधिक रानभाज्या व भरड धान्यांचे फलक, माहिती व पाककृती सादर केल्या. फांद भाजी, टाकळा, सराटा, बांबू, अंबाडी, सुरण, तोंडली, शेवगा, उंबर यांसह अनेक रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले.
तर नाचणी, ज्वारी, बाजरी, राळा, सावा, राजगिरा यांसारख्या भरड धान्यांवर आधारित विविध पदार्थ व उत्पादनांची विक्री करण्यात आली. वनस्पतीशास्त्र विभागातील एका विद्यार्थ्याने नाचणीपासून बिस्किटे व इतर उत्पादनांचा स्टार्टअपही सुरू केल्याचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक बीज राख्या तयार केल्या व देशी वाणांची बीज बँक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती .
महोत्सवाचे प्रास्ताविक समन्वयीका डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाने दिलेलं दान रानभाज्यां व भरड धान्य विषयी जनजागृती, संवर्धन व आहारात त्यांचे महत्त्व यासाठी महोत्सवाचे आयोजन केले गेले असे सांगितले. तसेच रानभाज्यां व भरड धान्य विषयी ज्ञान एका पिढीकडून पुढील पिढीकडे जाणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच.एस. जाधव, विज्ञानविद्या शाखा व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नारायण घनगावकर यांनीआपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन साक्षी भोसले व आभार प्रदर्शन डॉ. विकास नायकवडी यांनी केले.
चौकट
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाककृतींचे परीक्षण प्रा. अशोक चौधरी व प्रा. दिपाली पवार यांनी केले व उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी बनविलेल्या पर्यावरणपूरक बीज राख्या व देशी वाणांची बीज बँकही पाहुण्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरला.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संदीप देवीकर, प्रा. अभिजीत घावटे, डॉ. हर्षद शिर्के, प्रा. शारदा थोरात, प्रा. मीरा शिंदे, रियाज इनामदार, हनुमंत करपे, रोहित वाळके, ऋषिकेश लबडे, निखिल मगर व दुर्गेश बारस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.