शिरूर नगरपरिषदेतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार? ई-निविदा प्रक्रियेविना कामकाजाचा आरोप... महाराष्ट्र शासनाने ही दिले चौकशी आदेश..
शिरूरचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या काळात नगर परिषदेत सावळा गोंधळ
शिरूर , प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेत ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर न करता कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली असून यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला असून, या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी यांच्या पत्रानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तक्रारदार मेहबूब सय्यद यांनी दिली आहे,
प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, मनसे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे शहराध्यक्ष आदित्य मैड, मनसे चे रवींद्र लेंडे यांनी याबाबत तक्रार केली होती.
याबाबत जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद यांना तात्काळ वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दिनांक २२ जुलै २०२५ रोजी शासनाकडून आलेल्या पत्रात अनियमिततेबाबत स्पष्ट उल्लेख असून, यामध्ये ई-निविदा प्रणाली टाळून कामे मंजूर केल्याने पारदर्शकतेचा अभाव झाल्याची नोंद आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शक्यता असून, चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित होणार आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले असून, अहवाल सादरीकरणासाठी ‘तातडीचे’ निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.
शिरूर नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अध्याय झाला असून प्रशासनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे याबाबत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी सामील असून या सर्वांची चौकशी करावी असा अहवाल महाराष्ट्र आणि शासनाने सुद्धा दिला आहे. त्यामुळे शिरूर नगरपरिषद भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे.
मेहबूब सय्यद, उपाध्यक्ष मनसे जिल्हा सामाजिक कार्यकर्ते