शिरूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ११ जुलैला
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण दिनांक ११ जुलै रोजी होणार असल्याची माहिती बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
ही आरक्षण सोडत ११ जुलै दुपारी १२ वाजता, तहसिल कार्यालय, शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे होणार आहे.
या आरक्षणात अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षित करण्यासाठीची सोडत प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
या प्रक्रियेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेश क्र. पसप-३/कावि/७७५/२०२५ दिनांक ८ जुलै २०२५ नुसार करण्यात येणार आहे. शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांवरील आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत काढण्यात येणार आहे.
या महत्त्वाच्या सोडत प्रक्रियेसाठी शिरूर तालुक्यातील सर्व माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना उपस्थित राहण्याचे आवाहन म्हस्के यांनी केले आहे.