जातेगाव खुर्द व तळेगाव ढमढेरे शाळांना नवीन वर्गखोल्या आणि ग्रंथालयाची भेट...फोसेको इंडिया लिमिटेडचा शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी सीएसआर उपक्रम
शिरूर (प्रतिनिधी) –
फोसेको इंडिया लिमिटेड या कंपनीने त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलत शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा येथे नवीन वर्गखोल्या आणि तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळेला नवीन वर्गखोल्या आणि ग्रंथालयाची भेट दिली. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना आधुनिक व चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
या नव्या वर्गखोल्यांमध्ये आरामदायी फर्निचर, चांगली सुविधांचे व्यवस्था आणि आधुनिक शिक्षण साधनांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक चांगले व प्रेरणादायी वातावरण मिळणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला फोसेको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. प्रसाद चावरे, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, रोटरी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना चावरे म्हणाले, “या वर्गखोल्या म्हणजे केवळ इमारती नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आशा, संधी आणि भविष्य घडवण्याचे प्रतीक आहेत.”
शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे, हे लक्षात घेऊन फोसेको इंडिया लिमिटेडने ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांसाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे.
हा उपक्रम फोसेकोच्या शैक्षणिक विकासाला समर्पित CSR मोहिमेचा एक भाग असून, शिक्षणात प्रवेश आणि गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी CSR फंड मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीचे आणि सहकार्य करणाऱ्या रोटरी क्लबचे आयोजकांनी आभार मानले
शिक्षणाची मुहूर्तमेढ रचणाऱ्या फोसेको कंपनी च्या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.