शिरूर महसूल प्रशासनाची धडक कारवाई :१४ ऊसतोड कामगारांची वेठबिगारीतून मुक्तता
शिरूर, प्रतिनिधी
आलेगाव पागा ता.शिरूर येथील एका शेतामध्ये वेठबिगारीच्या स्थितीत अडकून पडलेल्या १४ ऊसतोड कामगारांची सुटका करण्यात प्रशासनाला मोठे यश आले असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (रा. ब्रम्हगाव, ता. पैठण, जि. संभाजीनगर, सध्या रा. गणेशनगर, आलेगाव पागा, शिरूर) यांनी लेबर लाईन या सामाजिक संस्थेच्या पोर्टलवर तक्रार दाखल करून ही बाब उजेडात आणली होती.
तक्रारीमध्ये त्यांनी शेतमालकाकडून कामगारांची होत असलेली पिळवणूक, वेठबिगारी व मानसिक छळ याबाबत माहिती दिली होती.
याप्रकरणी संदीप बाळू डूबे रा. आलेगाव पागा ता. शिरूर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कामगार बंदबिगार कायदा १९७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर शेळके करीत आहे.
या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कामगारांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिरूर उपविभागाच्या प्रांताधिकारी पूनम अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, निवासी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, कामगार अधिकारी संपत गुंजाळ व लेबर लाईन सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत शेतात अडकून पडलेल्या कामगारांची मुक्तता केली.
सुटकेनंतर शिरूर तहसील कार्यालयामार्फत कामगारांना अधिकृत सुटकेचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व कामगारांसाठी जेवणाची व त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचीही व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. काही कामगार दोन-तीन वर्षांपासून तेथे अडकून होते, ही बाब विशेषतः धक्कादायक ठरली.
याप्रसंगी शुभम गुरव, पराग कांबळे, अर्चना यादव (इंडिया लेबर लाईन, आजीविका ब्युरो, हडपसर) हेही उपस्थित होते.
संबधित शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या तात्काळ हालचाली व प्रशासनाच्या समन्वयातून कामगारांची झालेली सुटका ही प्रशंसनीय आहे. या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.