शिरूरच्या जुन्या पिढीतील पेंटर‘नवरंग’ उर्फ दत्तात्रय जामदार यांचे निधन...शहराच्या रंगीत ओळखीचा नवरंग मिटला.

9 Star News
0

 शिरूरच्या जुन्या पिढीतील पेंटर‘नवरंग’ उर्फ दत्तात्रय जामदार यांचे निधन...शहराच्या रंगीत ओळखीचा नवरंग मिटला.


शिरूर, दिनांक प्रतिनिधी (मुकुंद ढोबळे)

      शिरूर शहराच्या जुन्या पिढीतील अत्यंत कुशल, संयमी आणि रंगांनी नाते जोडणारे 'नवरंग' पेंटर उर्फ दत्तात्रय महादू जामदार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिरूर शहरातील एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

     सध्याच्या फ्लेक्स युगात आपण जेव्हा डोळे उघडतो, तेव्हा त्याआधीचं काळ लक्षात घेणं कठीण वाटतं. परंतु एक काळ असा होता, जेव्हा बोर्ड म्हणजे कलाकाराचा जीव होता. कुठलेही सण, निवडणूक, लग्न समारंभ, दुकानाचे फलक असो, सर्व काही हाताने रंगवलं जात होतं. त्या काळात ‘बरला पेंटर’ आणि ‘नवरंग पेंटर’ ही दोनच नावं प्रत्येकाच्या नजरेत झळकत असत. यातील नवरंग म्हणजेच दत्तात्रय महादू जामदार!

     त्यांनी रंगवलेले अक्षर म्हणजे कलात्मकतेची शुद्ध उदाहरणं. सुंदर गोलसर, आकर्षक अक्षरांतून दुकानाचे किंवा निवडणुकीचे बोर्ड उभे राहत. नुसतेच रंग नाही तर त्यामागे भावना असायच्या, कलाकृतीतून ओसंडून वाहणारी निष्ठा असायची. बोर्ड पूर्ण झाल्यावर स्वतःचे नावही इतक्या लाघवी पद्धतीने लहानशा कोपऱ्यात लिहायचे, की कलाकाराचा नम्रपणा तेथूनच जाणवायचा.

      दत्तात्रय जामदार हे कुंभार समाजाचे होते. अतिशय शांत स्वभावाचे आणि मनमिळावू होते.गणपती महोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी तयार होणाऱ्या मातीच्या गणपतींना रंगवण्याचे कामही तेच करत. त्यांची हातोटी एवढी जबरदस्त होती की, मातीच्या मूर्तींना प्राण फुंकल्यासारखं वाटायचं. बैलपोळ्याला बैलजोडी, दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराज, मावळे,सैनिक, गौरी-गणपतीच्या रंगीबेरंगी सजावटी – प्रत्येक सणासाठी ते रंगांनी नवा उत्सव तयार करायचे.

 


   त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत साधी, पण मनापासून होती. पाण्यासारखा स्वभाव, कोणतीही गाजावाजा न करता, फक्त कामातून ओळख निर्माण करणं हा त्यांचा स्वभावविशेष होता. ते खऱ्या अर्थाने ‘नावात नाही, कामात मोठेपण’ दाखवणारे होते.

    नवरंग पेंटर गेल्याचं दुःख हे फक्त एक व्यक्ती गेले असं नाही, तर एका युगाचा शेवट झाला अशी भावना आहे. त्यांच्या जाण्याने शिरूर शहरातील अनेक जुन्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आहेत. ज्यांनी त्यांना पाहिलं, त्यांचं काम अनुभवलं, त्यांना माहित आहे की ‘नवरंग’ फक्त नाव नव्हतं, तो एक रंगीबेरंगी काळ होता, जो आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे.

‘नवरंग’ पेंटरचे कार्य हे शिरूर शहराच्या सांस्कृतिक व चित्रकलेच्या इतिहासातील एक अढळ स्थान आहे. त्यांच्या आठवणींसोबत, त्यांच्या रंगांची जादूही या शहरात कायम राहणार आहे.

     आम्ही लहान असताना अनेकवेळा दुकानाचे बोर्ड पाहताना बरला पेंटर यांचे किती व नवरंग पेंटरचे यांचे किती बोर्ड यांची गणित लावत असत.

आमचे पेंटर नवरंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!