डाळिंब चोरीचा प्रयत्न उधळला; शिरूर तालुक्यातील मोटेवाडीत चोरांची दुचाकी घटनास्थळीच राहिली

9 Star News
0

 डाळिंब चोरीचा प्रयत्न उधळला; शिरूर तालुक्यातील मोटेवाडीत चोरांची दुचाकी घटनास्थळीच राहिली


शिरूर (प्रतिनिधी) 

मोटेवाडी (ता. शिरूर) येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा प्रयत्न उधळण्यात शेतकऱ्याला यश आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांनी आपली दुचाकी घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने पोलिस तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे.

       या अगोदर शिरूर तालुक्यातील उरळगाव व शिंदोडी येथील डाळींब बागेतून सहा लाखांचे डाळिंब चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत पोलिस तपास करत असताना पुन्हा आज पहाटे मोटेवाडी येथे डाळींब चोरीचा प्रकार शेतकऱ्याच्या सतर्कते मुळे फसला असला तरी चोरट्यांची मोटारसायकल मात्र सापडली आहे.

       शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथील शेतकरी संदीप येलभर हे दररोजप्रमाणे पहाटेच्या वेळी शेतात गस्त घालत होते. त्यावेळी काही अनोळखी व्यक्ती त्यांच्या डाळिंब बागेत संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शंका येताच येलभर यांनी आरडा-ओरडा केला, त्यावेळी घाबरून चोरट्यांनी घटनास्थळीच आपली दुचाकी सोडून पळ काढला.

     येलभर यांनी तत्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व प्राथमिक तपास सुरू केला. घटनास्थळी सापडलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यावरून चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी आदी फळबागांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने शेतात सीसीटीव्ही, हायमास्ट लाईट्स यांसारखी साधने बसवावीत, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.

पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!