प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची महापूजा संपन्न; पारंपरिक भक्तिभावाचा उत्सव उत्साहात साजरा
शिरूर, प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे यंदाही प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाची महापूजा भाविक भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने पार पडली.
यंदा पूजेचा मान शिरूरचे आमदार माऊली कटके व मनिषाताई कटके तसेच शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या शुभहस्ते साधण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल, शिरूर तालुक्यातील विविध गावांचे मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा संघ चालक मा. श्री संभाजी आप्पा गवारे यांनी प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे समन्वयक दादासाहेब गवारे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे आभार शिरूर तालुका भा. ज. पाटील संघटनेचे अध्यक्ष जयेशदादा शिंदे यांनी मानले.
पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक पालखी सजवून भक्तिपूर्ण भजन सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
दिवसभर ग्रामप्रदक्षिणा, पारंपरिक लळीत, भजन व कीर्तन अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ही सेवा पांडुरंग चरणी अर्पण केली जात आहे.
या भक्तिपूर्ण सोहळ्याने संपूर्ण विठ्ठलवाडी परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.