शिरूर येथील आनंद पतसंस्थेतील ठेवीदारांचा पैशाचा अपहार करणाऱ्या आरोपींना पकडा अन्यथा १२ ऑगस्ट पासून ठेवीदार बेमुदत उपोषण सुरू करणार
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील आनंद पतसंस्थेतील ठेवीदारांचा पैशाचा अपहार करणाऱ्या आरोपींना पकडले नाही तर आनंद पतसंस्थेतील ठेवीदार १२ ऑगस्टपासून शिरूर पोलीस स्टेशन समोर बेमुदत उपोषण तर काही ठेवीदार साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
याबाबतचे पत्र शिरूर पोलिसांना ठेवीदारांच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी सुभाष जैन,ललित सुराणा,सचिन लोढा, रामदास सरड, श्रीकांत चाबुकस्वार ,सीमा शेळके,वसंत क्षीरसागर, , सतीश छाजेड, प्रकाश येणारे, फईम सय्यद, योगेश चंडालिया, यश मुथा,भाऊ साहेब कवाष्टे,लता जाधव, मंगल बोथरा, किसन गवळी, रामभाऊ सरोदे,वीर बाई इत्यादी उपस्थित होते
शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आनंद पतसंस्थेतील अध्यक्ष अभय चोरडिया व त्यांच्या कुटुंबीयांनी पतसंस्थेतील कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप करून या प्रकरणी १ जुलै २०२४ रोजी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठेवीदारांचा संयम सुटू लागला असून, त्यांनी आता थेट पोलिसांना इशारा दिला असून जर १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत फरार आरोपींना अटक झाली नाही, तर आम्ही शिरूर पोलीस स्टेशनसमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. त्याचबरोबर इतर ठेवीदार साखळी उपोषण करणार आहेत.
आम्ही ठेवीदारांनी आमच्या जीवनभराच्या बचती संस्थेत ठेवल्या. त्या पैशांवर आमचे घरखर्च, औषधोपचार, शिक्षण, विवाह यांसारख्या गरजा अवलंबून आहेत. परंतु संस्थेतील अपहारामुळे अनेकजण संकटात सापडले आहेत. काहींनी उपचारा अभावी प्राण गमावले. काहींना मुलींच्या लग्नासाठी उसनवार घ्यावी लागली असून परतफेड अशक्य झाली आहे, आता जगून फायदा नाही जर आरोपींनी पोलिस पकडत नसतील तर आता आम्हाला उपोषणा शिवाय पर्याय उरला नाही.
आरोपी हे एका प्रतिष्ठित कुटुंबातील असून ते शिरूरमध्येच वास्तव्यास होते. पोलिसांनी तत्काळ अटक केली असती, तर आरोपीने लपवलेले पैसे कदाचित परत मिळाले असते. पण वर्षभर झाला तरी पोलिसांना ते शोधता आले नाहीत, ही बाब आश्चर्यकारक व दु:खद आहे," असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.