शिरूर प्रतिनिधी
प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळी हाजी (ता.शिरूर)येथे घडली आहे. येथील कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे थरार नाट्य घडले असून, दुकानाची तोडफोड करून दुकान मालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले आहेत. तर हल्ला करून पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडले आहे.
याप्रकरणी दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२,रा.तामकरवाडी-टाकळी हाजी, ता.शिरूर,जि.पुणे) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याने फिर्याद दिली आहे.
. याप्रकरणी जीवन रविंद्र गायकवाड (रा.कानगाव, ता.दौंड,जि.पुणे याच्यासह शारुख बाबू शेख (वय २६ वर्ष) आणि प्रशांत हनुमंत साठे (वय १९ वर्ष,दोघेही रा. पाटस, ता.दौंड, जि.पुणे) या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादीनुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय वाघ हा पत्नी स्नेहा हिच्यासह टाकळीहाजी येथे वास्तव्यास असून, त्याचे कुडांई मेन्स पार्लर हे सलून दुकान आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाचे नातेवाईक प्रेम विवाहाच्या विरोधात होते. तसेच या आधीही स्नेहाचा मावसभाऊ जीवन रविंद्र गायकवाड आणि नात्यातील इतर व्यक्तींनी प्रेम विवाहामुळे दत्तात्रय वाघ याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यासंबंधी दत्तात्रय वाघ याने पोलिसांमध्ये तशी तक्रारही यापूर्वी दाखल केलेली आहे.
मात्र, शुक्रवारी दिनांक ४ जुलै रात्री ९ वाजता दत्तात्रय वाघ हा त्याच्या सलूनमध्ये शटर बंद करून, आशुतोष भाकरे याचे केस कापत असताना, अचानक दुकानाचे शटर उघडून जीवन रविंद्र गायकवाड, शारुख बाबू शेख (वय २६) व प्रशांत हनुमंत साठे (वय १९) हे तिघे दुकानामध्ये घुसले. त्यांनी दत्तात्रय याच्या दुकानाच्या काचा फोडल्या. त्याचप्रमाणे दुकानातील साहित्याची नासधूस केली आणि जीवन गायकवाडने लोखंडी कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार करून, तिघा आरोपींनी दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी देऊन तीनही आरोपी मोटारसायकल वरून रांजणगावच्या दिशेने पळून जात असताना, गावकऱ्यांनी पाठलाग करून दोघा अनोळखी आरोपींना पकडून टाकळी हाजी पोलीस चौकीमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांची नावे शारुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच जीवन गायकवाडच्या मदतीने दत्तात्रय वाघ याच्यावर हल्ला केल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दत्तात्रय वाघ याला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून,त्यांच्या तक्रारीवरून वरील तिघा आरोपींविरोधात गंभीर दुखापत, तोडफोड व जीव घेण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरूर व टाकळी हाजी पोलीस हवालदार अनिल आगलावे करीत आहेत.
या घटनेमुळे टाकळी हाजी परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रेम विवाहाच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.