शिरूरच्या डॉ. राजेंद्र दुगड यांना आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ पुरस्काराने गौरव
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील ज्योतिष शास्त्र व हस्तरेषा शास्त्रातील ख्यातनाम तज्ञ डॉ. राजेंद्र बाबूलाल दुगड यांना अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या ‘ज्योतिष महाकुंभ मेळावा 2025’ या आंतरराष्ट्रीय संमेलनात लाईफटाईम अचिव्हमेंट हस्तरेषा तज्ञ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय ज्योतिष हस्तरेषा विद्वान गोल्ड मेडल अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
या भव्य संमेलनात आंतरराष्ट्रीय ज्योतिष व लालकिताब तज्ञ डॉ. अनिल वत्स आणि डॉ. नीता जानी यांच्या हस्ते डॉ. दुगड यांना गौरवचिन्ह, शाल-श्रीफळ व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे शिरूर तालुक्यात व संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. दुगड यांनी 1984 पासून हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास सुरू केला असून, त्यांनी सतत संशोधन आणि प्रयोगशीलतेच्या आधारे या क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. 2019 साली त्यांना हस्तरेषा शास्त्रात पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी बहाल करण्यात आली होती, तसेच त्याच वर्षी त्यांना गोल्ड मेडलिस्ट अवॉर्डही प्राप्त झाला होता.
हजारो जणांच्या जीवनातील समस्यांवर अचूक मार्गदर्शन करणारे, व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करणारे आणि भविष्यवाणीने अनेकांना नवसंजीवनी देणारे डॉ. दुगड हे आज एक आदर्श ज्योतिषतज्ञ म्हणून ओळखले जातात.
त्यांचा हा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर शिरूर तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरला आहे. अनेक ज्योतिषप्रेमी, समाजसेवक, शिष्यवर्ग व स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, भविष्यातही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.