शिरूरतालुक्यातील आंधळगाव येथे पिकअप व मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक...भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू;
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर-चौफुला महामार्गावर आंधळगाव(ता.शिरूर) परिसरात पिकअप व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या अपघातात संदीप रोहीदास मदने (वय ३२,रा.नागरगाव,ता.शिरूर, जि.पुणे)आणि विक्रम महादेव सकट(वय३२,रा.आंधळगाव, ता.शिरूर,जि.पुणे)या दोघांचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संदीप मदने हा तरुण नागरगाव येथून तर विक्रम सकट हा तरुण आंधळगाव येथून एकाच दुचाकीवरून शुक्रवारी(दि.११) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिरूर-चौफुला महामार्गावरून करडे येथील एका खासगी कंपनीत कामावर जाण्यासाठीनिघाले होते.दरम्यान, आंधळगाव परिसरातील साळुंखे वस्ती समोरील महामार्गावर शिरूरच्या दिशेने येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
झालेल्या जोरदार धडकेनंतर दोघांच्याही डोक्याला व शरीराला तसेच इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या.त्यानंतर संदीप मदने यास शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर विक्रम सकट यास पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र,अतिशय गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्यामुळे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
या अपघातामुळे आंधळगाव आणि नागरगाव परिसरात शोककळा पसरली असून,दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरूर पोलिसांनी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम (वय ३२, रा.रामलिंग,ता.शिरूर,जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.