महिला आयोगाच्या अध्यक्षा झोपा काढत आहेत का?
रूपाली चाकणकर यांच्यावर भाजपची टीका
शिरूर, दि. २८ (सा.वा.) - ऋतुजा राजगे या आमच्या भगिनीवर अन्याय झाला. परंतु, आजपर्यंत महिला आयोगाला जाग आलेली नाही. प्रत्येक गोष्टी आम्ही तुमच्या दारात घेऊन आल्या पाहिजे का, असा सवाल करत महिला आयोगाच्या अध्यक्षा झोपा काढत आहेत का, असा सवाल भाजपच्या प्रदेश सचिव वर्षा डहाळे यांनी केला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांना पदाचा अधिकार समजत नसेल, तर महिला आयोग पद संविधानिक व न्यायिक आहे. एखाद्या घटनेवर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असतो. परंतु, कदाचित तुम्हाला कायद्याचे ज्ञान नसेल. आजपर्यंत तुम्ही झोपा काढत आहात का. ऋतुजावर अन्याय झाला याबाबत दाद का मागितली नाही. त्यासाठी तुम्ही पुढाकार का घेतला नाही, असा सवालही डहाळे यांनी विचारला आहे.
शिरूर शहर व तालुक्यातील अनेकगावांत अवैध चर्च आहेत. ते जमीनदोस्त करावेत. गोमांस विक्रीची दुकाने व कत्तलखाने बंद करावेत अन्यथा कायदा हातात घेऊ, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी देऊन सांगली येथील ऋतुजा राजगे हिला न्याय द्यावा, असे आवाहन केले. तर शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात या पाद्रीची धर्मांतरासाठी वळवळ सुरू आहे ती ठेचण्यासाठी शिरूर मध्ये मोर्चा आहे.
निषेध मोर्चाची सुरुवात बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली.
सांगली येथील ऋतुजा राजगे या विवाहितेला न्याय मिळावा व महाराष्ट्र शासनाने धर्मांतरविरोधी कायदा आणावा, या मागणीसाठी शिरूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
या वेळी संग्रामबापू भंडारे महाराज, वर्षा डहाळे, नवनाथ पडळकर, धर्मेंद्र खांडरे, राहुल पाचर्णे, रेखाताई बांदल आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन दिले.