शिरूर शहरात धर्मांतराच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा २८जून दुपारी दोन वाजता भव्य निषेध मोर्चा
शिरूर प्रतिनिधी
सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्यांच्या गरोदर विवाहितेने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या सातत्यपूर्ण जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने 28 जून रोजी शिरूर शहरात भव्य जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा शनिवार 28 जून रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडणार असून, शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयावर जाणार आहे.
या आंदोलनात पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, ह. भ. प. संग्रामबापू भंडारे महाराज आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे हे प्रमुख उपस्थित राहणार असून, ते या आंदोलनात मार्गदर्शन करणार आहेत.
शिरूर तालुक्यातील काही भागांमध्ये काही व्यक्ती हिंदू समाजातील नागरिकांचे बळजबरीने व आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार करीत आहेत. या प्रकारांचा स्थानिक हिंदू समाजाकडून तीव्र विरोध होत असून, काहींनी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या आंदोलनात सर्व हिंदू बांधवांनी राजकीय भेद बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्र यावे आणि धर्मांतरासारख्या गंभीर प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.