पुणे जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई यंत्रांच्या उडडाणावर बंदी; १६ मे ते ३ जूनदरम्यान काटेकोर अंमलबजावणी
शिरूर प्रतिनिधी
दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोनचा वाढता वापर लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १६ मे २०२५ पासून ३ जून २०२५ पर्यंत पुणे ग्रामीण क्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॉट एअर फुगे आणि तत्सम मानव रहित हवाई यंत्रांच्या उडडाणावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
हा आदेश महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील कलम १०(२) सह कलम ३३(१)(यू) अंतर्गत देण्यात आला आहे. या कालावधीत कोणतीही व्यक्ती अथवा संस्था परवानगीशिवाय अशा हवाई यंत्रांचा वापर करताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील काळात भारतावर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोनचा वापर करुन टेहाळणी आणि अतिरेकी कारवाया करण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही बंदी एहतियाती उपाय म्हणून लागू करण्यात आली आहे.
नागरिकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे आणि कोणताही संशयास्पद ड्रोन उडताना दिसल्यास तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-२५६५७१७१ किंवा जवळच्या पोलिस स्टेशनच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.