पुणे जिल्ह्यात "एक गाव, एक पोलीस" योजना १ मेपासून कार्यान्वित – ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्थेला नवी दिशा
पुणे, दि. १ मे २०२५: ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक अभिनव योजना सुरू केली आहे. "एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार" या तंत्रज्ञान-सक्षम योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून ही योजना साकार झाली असून, संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील १५७४ गावांमध्ये ती राबवली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत, १३ तालुके, ३३ पोलीस ठाणे आणि विविध वाड्या-वस्त्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील आणि एक पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. यासाठी १२९२ पोलीस पाटील आणि १५२५ पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. याद्वारे पोलीस पाटील व अंमलदार यांनी गाव भेटी दरम्यान जिओ टॅग लोकेशन व फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे, जेणेकरून कार्यपद्धती अधिक पारदर्शक व परिणामकारक ठरेल.
गावपातळीवरील वाद, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, महिला व बालकांवरील अत्याचार यावर तातडीने कारवाई, तसेच सामुदायिक पोलीसिंगला चालना देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पोलीस व जनतेमधील विश्वासाचे नाते दृढ करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शांतता राखण्यासाठी ही योजना मोलाची ठरणार आहे.