शिरूरमध्ये महावितरणच्या कार्यालयातून केबल व कंडक्टरची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
शिरूर (प्रतिनिधी):
शिरूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातून ३२ हजार रुपये किमतीचा अल्युमिनियम कंडक्टर व केबल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत मानसिंग जगदीश नेवसे (वय ३५, रा. छत्रपती कॉलनी, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यालय बंद करून सर्व कर्मचारी घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कार्यालय उघडल्यानंतर वरिष्ठ अधिकारी वैभव बारवकर (सहाय्यक अभियंता) यांना बाहेर ठेवलेला अल्युमिनियम कंडक्टर व १२० एम.एम. केबल दिसून न आल्यामुळे संशय निर्माण झाला.त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, दि. ५ मे रोजी पहाटे अडीच वाजता एक अनोळखी इसम मोटारसायकलसह कार्यालयाच्या परिसरात येताना दिसला. त्याने त्याच्या दुचाकीला कंडक्टर व केबल बांधून ते चोरून नेल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खेडकर करीत आहे.
शिरूर वीज वितरण कार्यालयामध्ये झालेली चोरी ही यामधील माहितगार व्यक्तीने केली असेल एक ठेकेदारी माणुस किंवा एखाद्या कर्मचारी यांनी केली असल्याची दाट शक्यता निर्माण झाली असून याबाबत दबक्या आवाजात चर्चा ही आहे.
शिरूर वीज वितरण कार्यालयामध्ये दोन ते तीन गेट ओलांडून चोर आला कसा या ठिकाणी असणारा सुरक्षा रक्षक काय करीत होता. वीज वितरण कंपनीकडे सुरक्षारक्षक का नाही. केबल वायरी ठेवण्यासाठी मोठे गोडाऊन असताना बाहेर कसे काय ठेवले गेले. याबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे.