शिरूर येथे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक; शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी जेरबंद
शिरूर (प्रतिनिधी):
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३३ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेला शिरूर पोलिसांनी इंदापूर येथून अटक केली असून आरोपी महिलेस शिरूर प्रथम वर्ग न्यायालय खादर केले असता न्यायालयाने आठ मे पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
निशा लक्ष्मण शिंदे (रा. इंदापूर, जि. पुणे) हीने अनेकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवून पैसे उकळले होते.
या प्रकरणी विकास भिमराव नागरगोजे (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान आरोपी निशा शिंदे हिने फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या लोकांना मी सरकारी नोकरी लावण्याचे काम करते. तुमचे कोणी असेल तर सांगा त्यांना मी नोकरी लावते माझी वरपर्यंत ओळख आहे. असा विश्वास देऊन सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांचे पत्नीच्या
एचडीएफसी बँक खात्यावर २३ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन व १० लाख रुपये रोख, अशा एकूण ३३ लाख ४६ हजाराची रक्कम नोकरी लावण्याचे आमिष देऊन उकळली.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस हवालदार शिवाजी बनकर यांना तपासाचे आदेश दिले. आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होती. मात्र, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला.
पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर व पोलीस अंमलदार विजय शिंदे यांनी इंदापूर येथे धाड टाकून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीला शिरूर न्यायालयात हजर केले असता ८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी बनकर करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महीला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे यांचे पोलीस पथकाने केली आहे.