सायबर फसवणुकीपासून सावध! शिरूर पोलीस ठाण्याचे नागरिकांना आवाहन - पोलिस निरीक्षक संदेश केंजळे
शिरूर, दि. ४ मे:
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या अल्पज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सर्व नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना व सावधगिरीची माहिती दिली आहे.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर बँक केवायसी, पीएम किसान, एमएसईबी बिल अशा नावाखाली APK फाईल्स डाउनलोड करण्यास सांगितले जाते, ज्या तुमच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती चोरू शकतात. नागरिकांनी असे अॅप्स कोणत्याही परिस्थितीत डाउनलोड करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, कमी व्याजदरात त्वरित कर्ज देण्याचे आमिष दाखवणाऱ्या लोन फ्रॉड लिंक, अॅप्स आणि कॉल्स यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामार्फत अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचेही पोलीस सांगतात.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर – व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आदींवरून कमी किमतीत वस्तू विकण्याच्या बनावट जाहिराती देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर अर्ध्या किमतीत वाहन किंवा वस्तू देण्याचे आमिष दाखवले जात आहे. हे सर्व व्यवहार संशयास्पद असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
तसेच, "आपल्याला बँकेकडून, गुगल पे, फोन पे किंवा अॅमेझॉन पेवर लॉटरी लागली आहे" असे सांगणारे फोन कॉल्स हे देखील फसवणूक करणारे असतात. नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
पोलीस निरीक्षक केंजळे यांनी आणखी एक गंभीर बाब सांगितली – काही फसवणूक करणारे टोळके ED, CBI, Crime Branch, Narcotics विभाग यांचं नाव सांगून नागरिकांना कॉल करून त्यांच्या नातेवाइकांना अटक झाल्याची बनावट माहिती देतात व पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. ही देखील एक गंभीर फसवणूक आहे.
सायबर गुन्ह्यांसाठी अधिकृत तक्रार करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
राष्ट्रीय सायबर अपराध नोंदणी पोर्टल: https://cybercrime.gov.in
सायबर हेल्पलाईन क्रमांक: १९३०
किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा.
शहरातील नागरिकांनी सतर्क राहून सायबर फसवणुकीपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबीयांचा बचाव करावा, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून
करण्यात आले आहे.