शिरूर, प्रतिनिधी
मॉन्सूनपूर्व पावसाने शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिके उध्वस्त झाली असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे शिवसेना शिरूर तालुका शेतकरीसेनेच्या वतीने आज तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले.
सततच्या पावसामुळे शेतातील माती, बांध आणि काही बंधारे वाहून गेले असून, कांदा, डाळिंब, केळी, मका, टोमॅटो, आंबे यासह इतर भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या १० ते १५ दिवसांपासून जून महिन्यापूर्वीच झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आसमानी संकटामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठी आर्थिक समस्या उभी ठाकली आहे. सध्या पाऊस स्थिरावल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे, परंतु बी-बियाणे, खते आणि औषधे यासाठी त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
शेतकरीसेनेने मागणी केली आहे की, पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. तसेच, पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साधनांसाठीही शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे योगेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, शोभाताई सरोदे आणि शेतकरी सुभाष पडवळ उपस्थित
होते.