शिरूर तालुक्यात औद्योगिक परिसरात ड्रग व नशेली पदार्थांचे मोठे जाळे; प्रशासनाचे दुर्लक्ष? अनेक तरुण व्यसनाच्या आहारी पालकांनी केली भीती व्यक्त
शिरूर, दि. ६ (प्रतिनिधी): शिक्रापूर आणि रांजणगाव शिरूर या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमडी ड्रग्स (MD drugs) आणि नशेली पानांचे मोठे हब तयार झाले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तरुण पिढी या व्यसनांच्या आहारी गेल्याने गुन्हेगारीकडे वळत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज...
शिरूर तालुक्यात पानटपऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या टपऱ्यांवर तरुणांची नेहमीच गर्दी दिसून येते. या पानांमध्ये पांढऱ्या रंगाचा एक नशीला पदार्थ टाकला जातो, ज्यामुळे पान खाणारे काही काळ स्वतःची शुद्ध हरवून बसतात, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहती आणि इतर भागांमध्ये मोठे व्यावसायिक तसेच सामान्य तरुण एमडी ड्रग्सच्या गोळ्या, पावडर घेत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांना काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. यामागे मोठे राजकीय दबाव किंवा एखाद्या मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमडी ड्रग्सचा मुख्य विक्रेता शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असल्याची चर्चा आहे. तसेच, पुण्यातील एक मोठा व्यावसायिक या नशेली पानाच्या पावडरीचा पुरवठा शिरूरपर्यंत करत असून त्याचे संबंध पोलीस यंत्रणेशी असल्याची शंका काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिक्रापूर आणि शिरूरमध्ये पानटपऱ्यांवर नाममात्र कारवाई झाली. मात्र, तालुक्यात यापेक्षा जास्त दुकाने असताना केवळ तीनच दुकानांवर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, पोलिसांनी जप्त केलेल्या पांढऱ्या पावडरबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यात नशेली पदार्थ विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क तयार झाले असून, त्यांना प्रशासनाचा छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप होत आहे.
पान खाणाऱ्यांची वाढती संख्या आणि गावागावांमध्ये पसरलेली पानटपरी संस्कृती ही चिंतेची बाब आहे. पूर्वी मर्यादित प्रमाणात असलेले हे व्यसन आता तरुण पिढीला का ग्रासत आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये थैमान घातलेले एमडी ड्रग्स आता शिरूरसारख्या ग्रामीण भागातही पाय रोवत आहे. रांजणगाव-शिक्रापूर परिसरात ड्रग्स घेणाऱ्या तरुणांची मोठी टोळी असून त्यांच्या पार्ट्या होत असल्याची चर्चा आहे. मात्र, याची माहिती पोलिसांच्या गुप्तचर विभागाला कशी नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरूर तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशन हद्दीत पसरलेल्या या व्यसनांच्या जाळ्यामागे राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर या दुकानांवर आणि ड्रग्स विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर पुढील पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन बरबाद होईल आणि याला पोलीस प्रशासन व राजकीय नेते जबाबदार असतील, असे मत व्यक्त होत आहे.
ड्रगचे व्यसन करणारे तरुण घरात आणि बाहेर या व्यसनाने अस्वस्थ असून, घरातील लोकांवर हल्ला किंवा मारहाण करण्याच्या घटनात वाढ होऊ लागल्या आहेत.तर अनेक तरुण जास्त प्रमाणात ड्रग सेवन केल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात भरती केल्या जाण्याच्या संख्येत वाढ होत असून, याबाबत उपचार करणारे डॉक्टर यांनीही चिंता व्यक्त केली असून, वाढते ड्रग सेवन तरुणांचे जीवन व संसार उध्वस्त करीत आहे. व या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणाची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात नाशिक पाण्याची विक्री होती याबाबत सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी कृती समितीचे तालुका समन्वयक नितीन थोरात यांनी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या बैठकीत सांगितल्यामुळे तरी काही दुकानांवर कारवाई झाली. परंतु ड्रग विक्रेते मोठ्या जोमात आहे या व्यसनाच्या एडिट होऊन कोमात गेली आहे. यावर कारवाई करणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पुढे मोठे आव्हान आहे.