वाजेवाडीतील पुल गेला पाण्याने वाहून
संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी
शिरूर
( प्रतिनिधी ) वाजेवाडी ता. शिरुर येथील वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्याबाबत अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घटना घडत असताना दोन दिवसांपूर्वी येथे एका दुचाकीवर झाड कोसळले असताना नुकतेच येथील रस्त्यावरील पुलाचा पूर्ण मुरुम भराव व भाग पाण्याने वाहून गेल्याची घटना घडून वाहतूक पूर्ण बंद झाल्याने सदर घटनेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत बांधकाम विभाग आणि संथ गतीने काम करणारा ठेकेदार जबाबदार असल्याचा ठपका स्थानिकांनी ठेवला आहे.
वाजेवाडी ता. शिरुर सह परिसरात चार दिवसांपेक्षा अधिक काल संततधार पाऊस झाल्याने ओढे, नाले तुडुंब वाहत असताना सर्व पाणी येथील वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्या लगतच्या ओढ्यातून वाहत असताना येथील ओढ्यावरील मुरुमाच्या भरावाचा असलेला पुल वाहून जाऊन येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले असल्याने वढू बुद्रुक ते चौफुला वाहतूक ठप्प झाली असल्याने या घटनेला बांधकाम विभाग व लाल फितीतील शासकीय कारभार जबाबदार असल्याचे सांगत स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे. मुसळधार पावसाने नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच धांदल उडवली असून या रस्त्यावरील पूल वाहून असताना यापूर्वी पुलाच्या खाली पाणी जाण्यासाठी चार ते पाच नळ्या होत्या त्यातून पाणी वाहून जात होते पण रस्त्याचे काम सुरू झाल्यावर त्यातील फक्त एक नळी पाणी वाहून जाण्यासाठी असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले जाऊन नागरिकांच्या घरात गोठ्यात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असताना भरत शिवले, एकनाथ शिवले यांच्या गोठ्यात तर सतीश शिवले, भरत शिवले, मोहन शिवले, बाळासाहेब साठे यांच्या घरात पाणी जाऊन तसेच किसन शिवले यांच्या शेतीचे नुकसान झाले. रस्ता बनवण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून बाहेर आलेल्या लोखंडी सळया व मुरुमाच्या रस्त्यावरून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने शेतकरी आक्रमक होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्वतंत्र चौकट १ –
वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील मुरुमाचा भराव अतिवृष्टीमुळे वाहून गेला असून सदर ठेकेदाराला अत्यावश्यक सूचना दिल्या आहेत, संबंधित कामाच्या बाबतीत चौकशी करण्यात येणार असून रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्याच्या व योग्य काळजी घेण्याचे ठेकेदाराला सांगितले आणि सदर घटनेचा तपास करुन त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रणजीत दाईंगडे यांनी सांगितले.
स्वतंत्र चौकट २ –
वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्याच्या ठेकेदाराने सहा महिन्यांपासून संथगतीने काम चालवले असून पुलाच्या नळ्या बंद करणे, मुरूमाचा भराव व्यवस्थित न भरणे नागरिकांच्या जीविताला धोका होईल हे लक्षात न घेता निकृष्ट दर्जाचे काम करत असून या कामाची वरिष्ठांनी तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनेश शिवले यांनी केली आहे.
फोटो खालील ओळ – वाजेवाडी ता. शिरुर येथील वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील वाहून गेलेला पूल आणि पलीकडे अडकलेले
नागरिक.