गव्हाणवादी येथे एसटी बसच्या धडकेत बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
शिरूर शहर व नारायणगव्हाण परिसरात हळहळ
शिरूर, प्रतिनिधी
शिरूरजवळील गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहील्यानगर) गावच्या हद्दीत नायरा पेट्रोलपंपासमोर एसटी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बँकेत नोकरी करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे शिरूर शहर व नारायणगव्हाण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गिरीश धोंडीबा गायकवाड (वय ३४, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहील्यानगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
गिरीश हे शिरूर येथील आय आय एफ एल बँकेत काम करत होते. गुरुवारी (दि. ८ मे) सकाळच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बँकेत जाण्यासाठी नारायणगव्हाण येथून निघाले होते. अहील्यानगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी हद्दीत नायरा पेट्रोलपंपाजवळ शिरूरकडून अहील्यनगरकडे जाणाऱ्या एसटी बस (क्र. एमएच २० बीएल २२९८) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की गिरीश गायकवाड रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत सुभाष वसंत गायकवाड (वय ३८, रा. नारायणगव्हाण) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
या अपघातामुळे गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिरूर शहर व गिरीश गायकवाड यांच्या गावात शोककळा पसरली आहे. सामाजिक, बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.