शिरूर नगरपरिषदेसमोरील १७ एकर शासकीय जागेच्या हस्तांतरणासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक - आमदार माऊली कटके
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेसमोरील सुमारे १७ एकर शासकीय जागा नगरपरिषदेला परत मिळवून देण्यासाठी काल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही जागा पूर्वी नगरपरिषदेकडे होती, मात्र काही कारणांमुळे ती शासनाकडे जमा झाली होती. आता ती पुन्हा नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.
मुंबई मंत्रालय येथील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात ही बैठक पार पडली.
या बैठकीत शासकीय जमिनीच्या हस्तांतरणासह घोडनदी व शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, आमदार माऊली कटके,शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदर १७ एकर जागा नगरपरिषदेच्या ताब्यात आल्यास त्या जागेचा उपयोग तालुका क्रीडा संकुल, नाट्यगृह,शहरातील नागरी सुविधा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक उद्याने, किंवा अन्य विकासकामांसाठी करता येणार आहे. त्यामुळे ही बैठक शिरूर व घोडनदी शहराच्या योजनाबद्ध विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.