शिरूर बसस्थानकात महिलेच्या पर्स मधून आठ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले
शिरूर एस टी बस स्थानकात महिलेच्या पर्स मधून साडे आठ तोळे सोन्याचे दागिने असा ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
याबाबत रूपाली अनिल काळेल (रा. त्रिमूर्ती नगर, भिगवण रोड जवळ, बारामती, जि. पुणे) यांनी
फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, श्रीमती काळेल या गेल्या मलठण (ता. शिरूर) येथे भाच्याच्या लग्नासाठी आपली छोटी मुलगी तन्वी हिच्यासह आल्या होत्या. लग्नसोहळा उरकल्यानंतर आज दिनांक ११ मे दुपारी बारा वाजता त्या पुन्हा बारामती येथे जाण्यासाठी शिरूर बसस्थानकात आल्या होत्या . शिरूर बसस्थानकावर त्या एसटी ची वाट पाहात असताना दुपारी बारा च्या सुमारास फलाटावर चौफुल्यापर्यंत जाणारी बस आल्याने त्या दोन मुलींसह एसटी बसमध्ये (क्र. एमएच १४ बीटी ४१९३) बसल्या.
त्यावेळी सहज त्यांनी पर्समध्ये ठेवलेल्या दागिन्यांची चाचपणी केली असता पर्स हलकी लागल्याने त्यांनी उघडून पाहिले असता पर्समधे रूमालात गुंडाळून ठेवलेले साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि दीड तोळे वजनाची कर्णफूले रूमालात नसल्याचे आढळल्याने त्यांनी वाहकास बस थांबवायला लावून दागिने चोरी गेल्याची कल्पना दिली. वाहकाने बसमधील प्रवाशांकडे दागिण्यांबाबत विचारणा केली असता कुणीही काहीही न सांगितल्याने श्रीमती काळेल यांनी आपले बंधू प्रशांत भगवान गिते (रा. मलठण) यांना कळविल्यानंतर ते भाचा प्रसाद मिनीनाथ गिते हे तातडीने बसस्थानकावर आले. पोलिसांनी प्रवाशांकडे चौकशी केली. अखेर चोरी झाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप पुढील तपास करीत आहे.