शिक्रापुरात पीएमटी व दुचाकीच्या धडकेत तिघे तरुण जागीच ठार... मृतामध्ये तळेगाव ढमढेरे दोन तरुणांचा तर मावळच्या एकाचा समावेश
शिरूर (प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रस्त्यावर पीएमटी व दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील दोन तरुण तळेगाव ढमढेरे येथील तर एकजण मावळचा आहे. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार (वय १८ वर्षे), व हर्षल दिगंबर घुमे (वय १९ वर्षे दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे)तसेच आयुष अतुल जाधव (वय १६ रा. मावळ ता. मावळ जि. पुणे) हे तिघे जागीच ठार झाले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रस्त्याने तिघे मित्र त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एक्स जि ४७९६ या दुचाकीहून चाललेले असताना त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालय समोर समोरील वाहनाला ओहरटेक करत असताना युवकांची दुचाकी समोरून तळेगाव ढमढेरे बाजूने आलेल्या एम एच १२ एक्स एम ८८२१ या पीएमटीला समोरून धडकून भीषण अपघात झाला, सदर अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार वय १८ वर्षे व हर्षल दिगंबर घुमे वय १९ वर्षे दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे तसेच आयुष अतुल जाधव वय १६ रा. मावळ ता. मावळ जि. पुणे हे तिघे जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे, तर याबाबत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.