अक्षर मानव महिला संमेलन राळेगणसिद्धी येथे उत्साहात पार
शिरूर प्रतिनिधी
राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत महिला, कवी, डॉक्टर, वकील आणि गृहिणींचा व्यापक सहभाग लाभलेल्या अक्षर मानव महिला संमेलनाचा (२५,२६, २७ एप्रिल २०२५)तीन दिवसांचा उत्सव राळेगण सिद्धी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
हे संमेलन राही फाउंडेशनच्या डॉ. सुनीता पोटे आणि डॉ. संतोष पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
या संमेलनात भारताचे संविधान याच्या सामूहिक वाचनाने सुरुवात झाली. यानंतर महिलांवरील लैंगिक शोषण, आर्थिक स्वावलंबन, व्यक्तिस्वातंत्र्य, समाजातील रूढीपरंपरा या विषयांवर विचारमंथन झाले.
प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांनी महिलांना समाजातील परंपरागत चौकटीतून बाहेर पडून स्वतःच्या स्त्रीत्वाचा आणि माणूसपणाचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला.
राही फौंडेशनच्या डॉ. सुनीता पोटे यांनी ‘मातृत्व आणि वंशाचा दिवा’ या विषयावर सखोल विचार मांडले. संगीता नरके यांनी महिलांवरील सामाजिक अन्यायाची प्रखर मांडणी केली.
यावेळी हर्षदा पिलाने, स्वाती मापारी आणि अरुण मापारी यांनी स्त्री फसवणुकीच्या घटनांवर चर्चा व उपाययोजनांचा मागोवा घेतला. राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रांतील महिलांनी चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला.
संमेलनात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८ महिलांचा संविधान, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दुर्गा देशमाने (संविधान प्रचार), सुमन साळवे (मजुरांच्या मुलांचे शिक्षण), ज्योती धंदर (प्रामाणिक पोलीस अधिकारी), प्रतिभा इराकशेट्टी (मतिमंद मुलांची शाळा), मीरा सपकाळे (घरकामगार संघटना), शर्वरी सुरेखा (पाळी विषयी जनजागृती), प्रज्ञा काटे (बाल लैंगिक समस्या), वृषाली माने (संविधान लोकजागर परिषद).
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संतोष पोटे, सुजित, श्रीकांत डांगे, अजिंक्य किन्हीकर, प्रवीण जावळे, जावेदा, डॉ. बेंद्रे, रश्मी ताई यांचे विशेष सहकार्य लाभले.
समारोप सत्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून सामाजिक योगदानासाठी प्रेरित केले.
"माणसाने माणूस मारला" या कवितेने संमेलनाचा समारोप झाला.