गडचिरोलीतील उल्लेखनीय सेवेसाठी शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांना महासंचालक सन्मानचिन्ह
शिरूर, (प्रतिनिधी):
महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव दरवर्षी केला जातो. यंदाच्या महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्तकर्त्यांमध्ये शिरूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रदिनी, १ मे रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असताना नकाते यांनी घेतलेली धाडसी व परिणामकारक भूमिका, तसेच हिंगोली जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत दाखवलेली कार्यक्षमता यांची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली. सेवा काळात त्यांनी अनेक सामाजिक व जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे उपक्रम हाती घेतले होते.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जाहीर केलेल्या यादीत नकाते यांचा समावेश होताच शिरूर पोलिस ठाण्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नकाते यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांची ही निवड शिरूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.