गणेगाव दुमाला परिसरात दोन रानगवे दिसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण... शिरूर तालुक्याच्या पूर्व भागाला बिबट्याच्या नंतर आता रानगव्यांची दहशत..
शिरूर (प्रतिनिधी):
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गणेगाव दुमाला शिवारात रविवारी सकाळी दोन महाकाय रानगवे रस्ता ओलांडताना नागरिकांच्या नजरेस पडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच बिबट्याच्या उपस्थितीमुळे नागरिक त्रस्त असताना, आता रानगव्यांची जोडीही दिसल्याने नागरिकांमध्ये अधिक दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेचे काही उत्साही तरुणांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले असून ते सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमधून स्पष्ट दिसणारी ही रानगव्यांची जोडी पूर्ण वाढ झालेली असून त्यांचे वजन सुमारे ७०० किलोच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या आठवड्यातही या परिसरात रानगवे दिसल्याच्या चर्चा होत्या. मात्र यावेळी प्रत्यक्ष व्हिडिओ समोर आल्याने त्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. या भागात प्रथमच रानगवे दिसल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत असले तरी त्यासोबत भीतीही वाढली आहे.
वनविभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाबाहेर येतात. गव्यांचा कळप याच भागातून गेला असावा, आणि हे दोन गवे वाट चुकून मागे राहिले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी गव्यांना त्रास देऊ नये, डिवचू नये, तसेच शक्यतो गटाने बाहेर पडावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
सध्या वनविभाग या गव्यांची हालचाल लक्षात घेत असून ते कोणत्या मार्गाने आले आणि पुढे कुठे गेले याचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
वन विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी रानगवे फिरले आहे. त्या परिसराची स्थळ पाहणी केली असून, नागरिकांना याबाबत सूचनाही केल्या असल्याचे सांगितले असून, ज्या ठिकाणी रानगवे दिसले आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांच्यासमोर जाऊ नये त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, आपली जागा लगेच बदलावी अशा सूचना वन विभागाने दिल्या आहे.
भानुदास शिंदे, वनपाल,