अक्षय तृतीयेनिमित्त रांजणगाव महागणपतीला ५००१ आंब्यांचा भव्य नैवेद्य
शिरूर, ता. ३० प्रतिनिधी
अष्टविनायकातील आठवे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त ५००१ आंब्यांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला. हा महानैवेद्य सायंकाळी सामूहिक महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात आला.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात पहाटे ५ वाजता अभिषेकाने धार्मिक विधींची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजता मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व नैवेद्य अर्पण करण्यात आला. या वेळी मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती.
गणेशभक्त किरण मेणकर व बाळकृष्ण जांभळे यांच्या पुढाकाराने ५००१ आंब्यांची नैवेद्य अर्पणाची आरास उभारण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, पुजारी प्रसाद व मकरंद कुलकर्णी, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, ग्रामस्थ व अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांनी महागणपतीच्या दर्शनाबरोबरच आंब्यांच्या सुगंधी नैवेद्याचा प्रसाद घेत अक्षय तृतीयेला शुभारंभ केला. श्रद्धा आणि भक्तिभावाने भारलेले हे वातावरण दिवसभर मंदिर परिसरात अनुभवायला
मिळाले.