शिरूर तालुक्यात तहसीलदार आदेशाला विरोध; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यातील शिरसगाव फाटा ते पिंपळसूटी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गावकामगार तलाठी प्रमिला नागेश वानखेडे (सासर नाव प्रमिला विवेक गायकवाड, वय ४२ वर्षे, रा. खराडी बायपास, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ताराबाई पोपट भोईटे, खंडू पोपट भोईटे, महेश पोपट भोईटे व दादा पोपट भोईटे (सर्व रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरसगाव फाटा ते पिंपळसूटी या रस्त्याच्या तात्पुरत्या उघडण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने आदेश दिला होता. मात्र, संबंधित आरोपींनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. विशेषतः खंडू पोपट भोईटे यांनी "आम्ही कोणताही आदेश पाळणार नाही, रस्ता मोकळा करणार नाही, काहीही गुन्हा दाखल करायचा असेल तर करा," असे वक्तव्य करून शासकीय आदेशाचा सरळसरळ अवमान केला.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम २२३ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहे.