शिरूर तालुक्यात कोळगाव डोळस येथे १६८७ ब्रास किंमत १४ लाखाच्या काळ्या मातीची चोरी; शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी –
शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस (ता. शिरूर) येथील जमीन गट नंबर ११७ मधून अज्ञात चोरट्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात काळ्या मातीची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरीत १६८७ ब्रास काळी माती, अंदाजे १४ लाख १७ हजार ८४० रुपये किंमतीची माती जेसीबी मशीन आणि हायवा ट्रकच्या सहाय्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे
या प्रकरणी ग्रामसभा अधिकारी हर्षद बाळासाहेब साबळे (वय २९, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ रा. पारगाव सुद्रिक, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या जेसीबी आणि हायवा वाहनांचा वापर करून गौण खनिजाचे उत्खनन केले. हे उत्खनन शासनाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले असून, त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०३(२), खान व खनिज (विनियमन व विकास) अधिनियम, १९५७ चे कलम ४(अ) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ च्या कलम ९ आणि १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.