पोलिसांसमोर पळाले अन जाळ्यात अडकले शिक्रापूर पोलिसांच्या गस्तीत चंदनतस्कर जेरबंद
शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक कान्हूर मेसाई भागात गस्त घालत असताना अचानकपणे दुचाकीवरून एक पोते घेऊन आलेले दोघेजण पोलिसांना पाहून पळाले मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता ते चंदनतस्कर असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी चंद्रकांत दिलीप गायकवाड, अक्षय दिलीप गायकवाड दोघे या दोघांना चोरीच्या चंदनसह अटक केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई विशाल तानाजी देशमुख (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
चंद्रकांत दिलीप गायकवाड (वय २७ वर्षे), अक्षय दिलीप गायकवाड (वय १९ वर्षे दोघे रा. ढाकेवस्ती कवठे येमाई ता. शिरुर जि. पुणे) व भैरू मोरे (रा. वाळवणे सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे काल दिनांक २ एप्रिल दुपारी साडे बारा दरम्यान शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, विशाल देशमुख, अमोल रासकर हे गस्त घालत असताना हॉटेल संतोष समोर दुचाकीवर काहीतरी घेऊन आलेले दोघेजण पोलिसांना पाहून हॉटेलच्या पाठीमागे लपले, दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडून विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या जवळील गाठोड्यात पाहणी केली असता त्यामध्ये चंदन असल्याचे दिसल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर चंदन आम्ही सुपे येथील भैरू मोरे याला विक्री करणार असल्याचे सांगितले,
यावेळी पोलिसांनी त्या दोघांकडून ३५ हजार रुपये किंमतीचे चंदन व दुचाकीसह ताब्यात घेतले असून चंदन विकत घेणारा प्रमूख तस्कर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.