शिरूरच्या सिताबाई थिटे फार्मसी कॉलेजमधून २४ विद्यार्थ्यांना सुमासॉफ्टमध्ये थेट नोकरी!
शिरूर, २५ एप्रिल प्रतिनिधी
बेरोजगारीच्या सावटाखाली झुंजणाऱ्या तरुणांना दिलासा देणारी बातमी शिरूरहून समोर आली आहे. सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे पार पडलेल्या सुमासॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) यांच्या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये तब्बल २४ विद्यार्थ्यांची थेट निवड करण्यात आली आहे.
३०० विद्यार्थ्यांमधून झगडून वर आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे.
या यशस्वी उपक्रमामागे कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, तिथले प्राध्यापक, व व्यवस्थापन यांचे कसब आहे. सुमासॉफ्टचे प्रोजेक्ट मॅनेजर सचिन चाळके यांनी कंपनीविषयी माहिती देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या सोबत चिन्मय नाईक, सुमित टानपुरे, विजय जाधव, नारायणराव वैतळा, आदर्श सावंत, प्रणव खैरे हे अनुभवी अधिकारीही उपस्थित होते.
थिटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती आणि डॉ. अमोल शहा यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक) डॉ. सचिन कोठावदे यांनी प्लेसमेंट सेलच्या उपक्रमांची माहिती देत भविष्यातील योजनांचा आढावा दिला.
कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन डॉ. मनोज तारे यांनी केलं, तर प्रा. विजया पडवळ यांनी आभार मानले.
श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, हर्षवर्धन थिटे व समन्वयक शिवाजीराव पडवळ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कंपन्यांच्या दारात आपली गुणवत्ता घेऊन उभं राहिलेल्या या तरुणांच्या यशामुळे शिरूरचा गौरव
वाढलाय!