शिक्रापूर-चाकण रस्त्यावर करंदी येथे आगीनं धुमाकूळ! चार दुकाने खाक – लाखोंचे नुकसान
शिरूर (प्रतिनिधी): करंदी (ता. शिरूर) येथील भारत गॅस फाटा परिसरात मंगळवारी दुपारी भीषण आग लागून चार दुकाने जळून खाक झाली. टायर दुकानापासून सुरू झालेल्या आगीने गॅरेज, गॅस सिलेंडर विक्रीचे दुकान आणि हॉटेलला वेढा घालून लाखो रुपयांचे नुकसान केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत असलेल्या भारत गॅस फाट्याजवळील टायरच्या दुकानाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच शेजारील नागरिकांनी काही टायर आणि दुचाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले आणि शेजारील गॅस दुकानात गेल्याने गॅस सिलेंडरचे भीषण स्फोट होऊ लागले. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या आगीत टायर दुकान, मोठे गॅरेज, प्रेमाचा चहा हॉटेल आणि गॅस सिलेंडर विक्रीचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. ५० हून अधिक टायर, दुचाकी व इतर साहित्य आगीत भस्मसात झाले. आगीच्या भडक्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली आणि बघ्यांची गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच चाकण नगरपरिषद, रांजणगाव औद्योगिक वसाहत आणि पुणे प्रादेशिक अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी धावून आल्या. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या बचाव मोहिमेत करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, माजी उपसरपंच पांडुरंग ढोकले, वर्षा थिटे, पोलीस शिपाई प्रताप कांबळे, सागर वर्पे, अविनाश तांबे, आपदा मित्र महेश साबळे पाटील तसेच भाजपा उपाध्यक्ष अशोक शेळके, भरत ढोकले, माऊली ढोकले, सुदाम ढोकले आणि प्रदीप ढोकले यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
ही घटना प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांसमोर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. दुकानदारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांना मदतीची गरज आहे.