शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात मेफेड्रोन हा अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याकडून मेफेड्रोन पावडर व एक मोबाईल असा एकूण ३ लाख १७ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली आहे.
शिक्रापूर परिसरात काही दिवसापूर्वीच दोन नशेली पानांच्या दुकानावर कारवाई केल्यानंतर आता मेफेड्रोन अमली पदार्थ विकणारी महिला अटक केल्यामुळे नक्की शिक्रापूर परिसर नशेली पदार्थांचा हब झाला नाही ना अशी शंका येत आहे.
जबीन जावेद शेख (वय 38 वर्षे, रा.गल्ली नंबर 2, पिंपळे गुरव, पुणे ) या महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर रांजणगाव शिरूर तीनही पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात ड्रग सदृश्य वस्तू विकत असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात होती त्यात शिक्रापूर पोलिसांनी व शिरूर पोलिसांनी नसलेली पान विक्रेत्यांवर कारवाई केली होती.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शिरूर तालुक्यात अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आदेश दिले होते.
या आदेशानुसार पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपास करत असताना दिनांक ४ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिक्रापुर पोलीस स्टेशन पथक शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पुणे शाखेचे पोलीस हवलदार तुषार पंदारे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की कोरेगाव भिमा डिंग्रजवाडी फाटा येथे एक महिला संशयास्पद हालचाली करत असून ती तिचेजवळील पर्समधून एक लहान पिशवी काढून रस्त्याने जाणारे-येणारे व्यक्तींना दाखवित आहेत, ही माहितीच्या आधारे पोलीस पथक त्या ठिकाणी जाऊन त्याठिकाणी माहितीच्या वर्णनाची महिला संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले पोलीस पथकातील महिला पोलिस अंमलदार पूजा सावंत यांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता महिलेने तिथं नाव जबीन जावेद शेख (रा.पिंपळे गुरव पुणे) असे सांगितले. सदर महिलेच्या पर्स ची तपासणी केली असता पर्समधून प्लास्टिकची पारदर्शक पिशवी व त्यामध्ये हाफव्हाईट रंगाची 15.85 ग्रॅम वजनाची पावडर (मेफेड्रोन अंमली पदार्थ ) व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण ३ लाख १७ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, शिक्रापुर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार नवनाथ नाईकडे, रोहीत पारखे, शिवा चितारे, महिला अंमलदार पुजा सावंत यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे.